गायीच्या दुधाची धार प्रवाही, म्हशीच्या दुधाची धार घटली
दुसरीकडे गायीच्या दूध संकलनात १० हजार लिटरने वाढ
कृषी सेवक | २१ मे २०२४ | संपूर्ण जळगाव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता आहे. जिल्हाभर गायीच्या दुधाची धार मात्र प्रवाही आहे, तर त्यातुलनेत म्हशीच्या दुधाची धार कमी झाली आहे. अलीकडेच जिल्हा दूध संघाने प्रतिलिटर दरात वाढ केली आहे. गायीच्या दूध संकलनात १० हजार लिटरने वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने जिल्ह्यात बहुतांशी भागांत दुष्काळाची परिस्थिती आहे. विशेषतः चाळीसगाव तालुक्यात गंभीर दुष्काळ घोषित केला गेला आहे. खरिपाच्या हंगामात शंभर टक्के नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. तालुक्यात सध्या ३२ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे, ज्याचा थेट फटका पशुपालन आणि दूध व्यवसायाला बसला आहे.
केळी, पपई पिकावर अवकाळी पावसाचा परिणाम: खान्देशात रोपांची टंचाई
एकीकडे दुष्काळ असूनही जिल्हा दूध संघाकडे गायीच्या दुधाचे प्रतिदिन १० हजार लिटरने संकलन वाढले आहे. गेल्या महिन्यात दूध संघाकडे जिल्हाभरातून १ लाख ५० हजार लिटर दूध जमा होत होते. आता १ मेपासून हे संकलन १ लाख ६० हजार लिटरवर पोहोचले आहे. दुष्काळी स्थिती असतानाही हे संकलन वाढले असल्याचे दूध संघाच्या व्यवस्थापनाने सांगितले आहे. गायीच्या दुधासोबतच म्हशीच्या दुधाचे दर देखील वाढवले गेले, परंतु तीव्र उन्हामुळे म्हशीच्या दूध उत्पादनात घट झाली आहे. प्रतिदिन संकलनात ८ ते १० हजार लिटरने म्हशीचे दूध कमी झाले आहे.
दूधाचा ओघ कमी
चाळीसगाव तालुक्यात गंभीर दुष्काळाचे परिणाम स्पष्टपणे दिसत आहेत. मे महिन्यात गाय आणि म्हशीच्या दुधात 25 टक्के घट झाली आहे. उष्णतेसोबतच ग्रामीण भागात चारा-पाण्याची टंचाई असल्याने दुधाचा ओघ कमी झाला आहे, असे दूध ठोक विक्रेते जितेंद्र वाबळे यांनी सांगितले.
यशोगाथा : आठवी पास शेतकऱ्याची यशस्वी आंबा शेती; वर्षाला कमावतो लाखो रुपये!
जिल्हा दूध संघाने १ मेपासून गाय आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपये ४० पैशांची वाढ केली आहे. दुसरीकडे गायीच्या दुधाचे संकलन प्रतिदिन १० हजार लिटरने वाढले आहे. उन्हाळ्यात म्हशीच्या दूध उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो. पावसाळ्यात हे संकलन पूर्ववत होईल, असे आमदार मंगेश चव्हाण, अध्यक्ष, जिल्हा दूध संघ यांनी सांगितले.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम