कोल्हापुरात गूळ सौद्याचा पेच

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २५ नोव्हेंबर २०२२ | कोल्हापूर बाजार समितीत गूळ सौद्याचा पेच आजही कायम राहिला. गुळाचे दर पडल्यामुळे शेतकरी संतप्त आहेत. मंगळवारी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत सौदे बंद पाडले होते.

गुळाला किमान हमीभाव मिळावा, व्यापाऱ्यांकडून होत असलेली पिळवणूक बंद व्हावी तसेच कर्नाटकातून येणारी गुळाची आवक थांबवावी या त्यांच्या मागण्या आहेत. त्यावेळी प्रशासक प्रकाश जगताप यांनी हस्तक्षेप करून उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी एक पाऊल मागे घेतले होते.

सौदे सुरू झाले होते. सकाळी दहाच्या सुमारास सौदे सुरू झाल्यानंतर काही गुळाचे सौदे प्रति क्विंटल ३७०० रुपयांच्या वर निघाले तर काही गुळाचे सौदे त्यापेक्षा कमी दरात निघाले. त्यामुळे शेतकऱ्यांचा पुन्हा भडका उडाला. त्यांनी सौदे सुरू करण्यास नकार दिला. या प्रश्नावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू होते. परंतु त्याला गुरूवारीही यश आले नाही. गुळाला प्रति क्विंटल ३७०० रूपयांपेक्षा कमी दर घेणार नाही, अशी भूमिका घेत गूळ उत्पादकांनी सौदे काढण्यास नकार दिला. तर बाजारभावाप्रमाणे जो काय दर निघेल तो दर देऊ, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे पेच कायम आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम