शेतकऱ्यांसाठी एक वरदान गांडूळ खत

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ३ नोव्हेंबर २०२२ | भारत देशात रासायनिक खताचे आगमन व त्यांचा वापर होण्यापूर्वी शेतकरी शेणखत, कंपोस्ट खत, गाळाचे खत, निरनिराळया पेंडींचा वापर, पिकांची फेरपालट यांचेद्वारे जमिनीची सुपिकता टिकवून ठेवत असे. कालांतराने शेतकरी रासायनिक खतांचा वापर प्रमाणापेक्षा जास्त करु लागले व त्यामुळे त्याचा दुष्परिणाम पिकावर तसेच जमिनीत दिसून येऊ लागला. पर्यायाने शेतकरी, पाणी, प्राणी, पक्षी मानवी आरोग्य व गांडूळ मित्रांचे अस्तित्वच धोक्यात आले.
हजारो वर्षापासून गांडूळे अस्तित्वात असून त्यांचे रंग व आकार भिन्न भिन्न प्रकारचे आढळून येतात. गांडूळे जांभळी, लाल, तांबडी, निळी, हिरवी, तपकीर व फिकट तांबूस अशा विविध रंगाची असतात.सर्वात लहान आकाराची गांडूळे १ इंचापेक्षाही कमी लांबीची, तर सर्वात मोठे १० फूट लांबीची गांडूळे ऑस्ट्रलियात आहेत. दक्षिण आफ्रिकेत अलिकडे अजगरासारखी अजस्त्र आकाराची गांडूळे दिसून आली आहेत. त्यांची लांबी २० फूट व मध्यभागाची जाडी सुमारे ३ फूटांपर्यंत असते. पण सर्वसाधारण नेहमी आढळून येणारे गांडूळे ६ ते ८ इंच लांबीची असतात, मोठया प्रकारची गांडूळे जमिनीत ३ मीटर खोलीपर्यंत जातात. आणि माती हे खाद्य म्हणून वापरतात.
जमिनीचा सुपीक थर होण्यासाठी गांडुळाचे महत्त्वाचे कार्य आहे. गांडुळाच्या शरीरामध्ये प्रोटोलायटीक, सेल्युलो लाटकीक आणि लिग्नो लायटीक एन्झाईम्स असतात . या एन्झाईम्समुळे सेंद्रिय पदार्थांचे विघटन होऊन साध्या सेंद्रिय पदार्थांतील सहजीवी जीवाणू व अॅक्टीनोमायसीटीस बुरशीमुळे लिगनीनयुक्त सहसा लवकर न कुजणार्‍या पदार्थांचे अन्नद्रवीकरण होते.
गांडूळ ह्या प्राण्याचा अॅनिलिडा समूहात व ओलिगोचीटा वर्गात समावेश होतो. आपल्या शेतीसाठी गांडूळ नवीन नाहीत. मराठीत गांडूळ,, दानवे वाळे, शिदोड अथवा केंचवे या नावाने ओळखल्या जाणार्‍या या प्राण्याला इंग्रजीत ‘अर्थवर्म’ असे नाव आहे. शेतीमधील विषारी किटकनाशकांच्या व रासायनिक खतांच्या वापरामुळे उत्पादन खर्चात वाढ तर होतेच परंतु पर्यावरणावर दुष्परिणामही होतो. त्यामुळे जगातील बरेच देश गांडूळांचा वापर करीत आहेत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम