राहुरी कृषी विद्यापीठातर्फे कृषी सल्ला

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १९ नोव्हेंबर २०२२ | सध्या रब्बी हंगाम सुरु असून शेतकऱयांना राहुरी विद्यापीठातर्फे कृषी सल्ला आणि मार्गदर्शन करण्यात येते . पिकांची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती.
करडई – मावा किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी करडईची पेरणी लवकर करावी. उशिरा पेरणी केलेले करडई पीक मावा या रस शोषण करणाऱ्या किडीच्या मोठ्या प्रादुर्भावाला बळी पडते.
कापूस -वेचणी अवस्था पिकातील अंदाजे ३० ते ३५ टक्के बोंडे फुटल्यावर पहिली वेचणी करावी. साधारणपणे १५ ते २० दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेचण्या कराव्यात. वेचणी सकाळी करावी, कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा, वाळलेली पाने कपाशीला चिकटत नाहीत. कापूस वेचणी आटोपल्यानंतर सर्व पऱ्हाट्या उपटून शेताबाहेर न्याव्यात. त्यांचा कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वापर केल्यास त्यातील किडींच्या विविध अवस्था नष्ट होतील.
रब्बी ज्वारी -उगवण अवस्था रब्बी ज्वारीमध्ये पहिली कोळपणी पेरणीनंतर तीन आठवड्यांनी फटीच्या कोळप्याने करावी. यामुळे तणांचे नियंत्रण व पिकाला मातीची भर दिली जाते.

भुईमूग- खरीप हंगामातील पीक निघाल्यानंतर जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे वेगवेगळ्या किडींच्या जमिनीतील सुप्त अवस्था नष्ट होतील.
गहू – पेरणीपूर्व तयारी गव्हाची पेरणी १ ते १० नोव्हेंबर या कालावधीत करावी. पेरणीसाठी खालील वाणांचा वापर करावा. बागायती वेळेवर पेरणीकरिता : एनआयएडब्लू ३०१ (त्र्यंबक), एनआयएडब्ल्यू ९१७ (तपोवन), एनआयडीडब्ल्यू २९५ (गोदावरी) बागायती उशिरा पेरणीकरिता : एनआयएडब्ल्यू ३४, एकेएडब्ल्यू ४६२७ जिरायत पेरणीकरिता : एनआयडीडब्ल्यू १५ (पंचवटी), एकेडीडब्ल्यू २९९७ (शरद) कमी पाण्यात पेरणीकरिता : निफाड ३४, एनआयएडब्ल्यू १४१५ (नेत्रावती) हेक्टरी १०० ते १२५ किलो बियाणे वापरावे. पेरणीच्या वेळी हेक्टरी ६० किलो नत्र, ६० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश व पेरणीनंतर ३ आठवड्यांनी खुरपणी केल्यानंतर उर्वरित ६० किलो नत्र द्यावे.ऊस
पेरणीपूर्व तयारी पूर्वहंगामी ऊस लागवड करण्यासाठी विद्यापीठाने विकसित केलेल्या जातींची निवड करावी. बेणे प्रक्रिया : लागवडीपूर्वी बेण्यास मॅलेथिऑन ३०० मिलि किंवा डायमेथोएट २६५ मिलि किंवा कार्बेन्डाझिम १०० ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी या द्रावणात १० मिनिटांसाठी बेणे प्रकिया करावी. त्यानंतर ॲसिटोबॅक्टर १० किलो किंवा द्रवरूप अॅसिटोबॅक्टर १ लिटर अधिक स्फुरद विरघळविणारे जिवाणू १.२५ किलो प्रति १०० लिटर पाणी या द्रावणात ३० मिनिटे बुडवून ठेवावीत. खवले व पिठ्या ढेकूण या किडीपासून संरक्षण मिळण्यासाठी पूर्वहंगामी उसाची लागवड करताना, लागणीपूर्वी बेण्यास मॅलेथिऑन (५० ईसी) ३०० मिलि किंवा डायमेथोएट (३० ईसी) ३०० मिलि प्रति १०० लिटर पाणी या द्रावणामध्ये बेणे १० मिनिटे बुडवून बेणे प्रक्रिया करावी.

बटाटा -पेरणीपूर्व तयारी रब्बी हंगामासाठी बटाटा या पिकांच्या लागवडीकरिता कुफरी ज्योती, कुफरी लवकर, कुफरी सिंधुरी, कुफरी सूर्या, कुफरी पुखराज इ. जातींचा वापर करावा.

वाटाणा – पेरणीपूर्व तयारी रब्बी हंगामासाठी वाटाणा या पिकांच्या लागवडीकरिता बोनव्हिला, अरकेल, फुले प्रिया इ. वाणांचा वापर करावा. ०२४२६- २४३२३९ (प्रमुख अन्वेषक, ग्रामीण कृषी मौसम सेवा, आणि प्रमुख, कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
तूर -फुलोरा अवस्था शेंगा पोखरणाऱ्या व पानाफुलांची जाळी करणाऱ्या (मरुका) अळीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी इंडोक्झाकार्ब (१७.८ ई.सी.) ०.७ मिलि किंवा ईमामेक्टीन बेंझोएट (५ टक्के दाणेदार) ०.४ ग्रॅम किंवा क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ ईसी) ०.३ मिलि.

हरभरा – जिरायत हरभरा पिकातील तण नियंत्रणासाठी पेरणीनंतर २०-२५ दिवसांनी पहिली व ३०-३५ दिवसांनी दुसरी कोळपणी करावी. घाटे अळीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी एकरी चार कामगंध सापळे लावावेत. २० पक्षिथांबे उभारावेत.
कोरडवाहू क्षेत्रात पिकास पाणी देणे शक्य नसल्यास पीक २० दिवसांचे झाल्यावर १९:१९:१९ या विद्राव्य खताची १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. पीक फुलोरा अवस्थेत असल्यास सूक्ष्म अन्नद्रव्ये (ग्रेड २) याची १० मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
घाटे अळीच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क (५%) किंवा ॲझाडिरेक्टीन (१५०० पी.पी.एम.) ५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे जैविक कीटकनाशकाची फवारणी घ्यावी.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment