शेतकरी या कारणाने विकतोय कमी भावात कापूस !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । ४ फेब्रुवारी २०२३।  राज्यातील कापूस शेतकरीला कोणी वाली उरला आहे की नाही, असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडू लागलाय. व्यापारी आणि शासन यांच्या कैचीत शेतकरी मात्र अडकून पडल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकवलेला कापूस आता घरात ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

जळगाव जिल्ह्यासह चोपडा तालुक्यात पूर्व हंगामी व हंगामी कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर होत असते आणि कापसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतले जाते. कापूस लागवडीपासून तर कापूस काढणीपर्यंत शेतकऱ्यांना बऱ्याच संकटांना तोंड द्यावे लागते. कापसावरील अळीचा प्रादुर्भाव, विविध रोगाचा प्रादुर्भाव, वातावरण बदलाचा प्रादुर्भाव, अशा अनेक समस्यांना तोंड देत शेतकरी कापसाचे उत्पन्न घेत असतो. यासाठी भरमसाठ खर्च देखील येतो. ज्यावेळी कापूस वेचणीला येतो. त्यावेळेस व्यापाऱ्यांकडून मुहूर्ताचा भाव दिवाळीला १४ आणि १५ हजार रुपयांये दिला जातो, परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या घरात कापूस येतो. त्यावेळेस त्या कापसाला भाव ७ आणि ८ हजाराच्या वर जात नाही. त्यामुळे कापूस उत्पादनासाठी लागलेला खर्च, व्याजाने घेतलेले पैसे याची साधी परतफेड सुद्धा या शेतकऱ्यांना करता येत नाही.
कापसाचे भाव वाढतील, या आशेने शेतकरी राजा आपल्या घरामध्ये अडचण सहन करून कापूस साठवून ठेवतो.

परंतु कापसाचा भाव वाढण्याऐवजी दिवसेंदिवस कमी होताना दिसून येत असल्याने शेतकरी मात्र संकटात आणि चिंतेत सापडलेला आहे. अशीच परिस्थिती सध्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांची झालेली आहे. गेल्या चार महिन्यांपासून भाव वाढेल या अपेक्षाने कापूस घरात भरून ठेवलेला आहे. परंतु भाव काय वाढत नाही. भाव वाढण्याऐवजी रोज त्यामध्ये घट होत असल्याने आणि कापूस जास्त दिवस घरात साठवून ठेवल्याने त्यापासून त्वचेला खाज सुटण्याचे प्रमाण आता वाढू लागले आहे. नाईलाजाने शेतकऱ्यांना कमी भावात का असेना साठवलेला कापूस विकावा लागत आहे. कापसाला शासनाकडून योग्यवेळी हमीभाव दिला गेला असता तर व्यापाऱ्यांनी देखील हमीभावाने कापूस खरेदी केला असता, परंतु शासन शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांनी आता कोणाकडे जावे, हा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे पडलेला आहे.

बातमी शेअर करा
#cotoun
Comments (0)
Add Comment