केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय : फळे व भाजीपाला निर्यातीचा मार्ग सुटणार !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १० नोव्हेबर २०२३

अनेक शेतकरी फळे आणि भाजीपाल्याचे उत्पादन घेवून आपला आर्थिक कारभार चालवीत असतात पण गेल्या काही महिन्यापासून या शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले होते. पण आता केंद्र सरकारने फळे आणि भाजीपाल्याच्या निर्यात वाढीसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या ‘कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणा’ने (अपीडा) संयुक्त अरब अमिराती या देशातील आघाडीची जागतिक कंपनी असलेल्या लुलू हाइपरमार्केटसोबत फळे व भाजीपाला निर्यातीसाठी सामंजस्य करार केला आहे.

याबाबतचे एक पत्रक केंद्र सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, अपीडा गल्फ कॉर्पोरेशन कौन्सिलच्या सदस्य देशांमध्ये भरडधान्यांसह (बाजरी, ज्वारी, रागी) अन्य भारतीय कृषी उत्पादनांच्या निर्यातीसाठी प्रोत्साहन देत आहे. त्याचाच एक भाग म्हणून संयुक्त अरब अमिराती देशातील लुलू या कंपनीसोबत हा करार करण्यात आला आहे. मिस्त्र आणि पश्चिमेकडील अन्य देशांमध्ये लुलू हाइपरमार्केट समूहाचा मोठा विस्तार आहे. या समूहाची व्यापकता पश्चिम आशिया आणि एकूणच आशिया खंडात मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

लुलू समूह हा बहरीन, कुवैत, ओमान, कतार, सऊदी अरब आणि संयुक्त अरब अमिराती हे गल्फ कॉर्पोरेशन कौन्सिलचे सदस्य देश असलेल्या सर्वच देशांमध्ये पसरला आहे, असेही अपीडाने आपल्या पत्रकात म्हटले आहे. या देशांमध्ये भारतीय फळे व भाजीपाल्यासह अन्य कृषी उत्पादनांची निर्यात करण्यासाठी गल्फ देशातील आघाडीची जागतिक कंपनी असलेल्या लुलू हाइपरमार्केट या कंपनीसोबत झालेल्या सामंजस्य करारावर सरकारकडून स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहे. हा समूह वेगवेगळ्या आयातदार देशांच्या गरजेनुसार उत्पादनांची लेबलिंग करण्यासाठीही मदत करणार असल्याचे अपीडाने म्हटले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम