कृषी सेवक । ५ मे २०२४ । दहशतवाद्यांकडून भारतीय वायुसेनेच्या वाहनांवर गोळीबार करण्यात आला आहे. शनिवारी जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात सदर घटना घडली. या हल्ल्यात एक जवानाचा मृत्यू झाला आहे तर, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सुरनकोट भागातील सनई टॉपकडे वाहने जात असताना संध्याकाळी हल्ला झाला असून या हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे. तसेच, काँग्रेसने नेते राहुल गांधी यांनी देखील या हल्ल्याचा निषेध केला आहे.
राहुल गांधी यांनी एक्स या समाज माध्यमांवर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. “जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये दहशतवाद्यांकडून आपल्या भारतीय वायुसेनेच्या वाहनांवर गोळीबार करण्यात आला आहे. या घटना लाजीरवाणी आणि दुखद आहे. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो. तसेच या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाला मी श्रद्धांजली अर्पण करतो. या दुख:च्या वेळी आम्ही जवानांच्या कुटुंबियांबरोबर आहोत. या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी मी प्रार्थना करतो”, असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले.
तुरीच्या भावात ५०० रुपयांची घसरण; शेतकरी परेशान!
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी देखील एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. “जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये भारतीय वायुसेनेच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने वृत्त ऐकूण दुःख झाले. मी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. दहशतवादाविरुद्ध या लढाईत आम्ही एकसंघपणे उभे आहोत. या हल्यात शहीद झालेल्या जवानाच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो,” असे ते म्हणाले.
या हल्ल्यानंतर राष्ट्रीय रायफल्सच्या एका तुकडीने परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे. ज्या वाहनांवर हल्ला झाला, त्यांना शाहसीतारजवळील सामान्य परिसरात हवाई तळाच्या आत सुरक्षित ठेवण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे मागील दोन आठवड्यांतील ही तिसरी घटना आहे. यापूर्वी २२ एप्रिल रोजी थानमंडीच्या शाहद्रा शरीफ भागात अतिरेक्यांनी गोळीबार केल्याने एका ४० वर्षीय गावकऱ्याचा मृत्यू झाला होता. तर २८ एप्रिल रोजी उधमपूरच्या बसंतगढ भागात मोहम्मद शरीफ या ग्रामरक्षकाची हत्या झाली होती. याशिवाय २१ डिसेंबर रोजी पुंछमधील देहरा की गली आणि बुफलियाज दरम्यान मुघल रोडवर त्यांच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चार जवान शहीद झाले होते. राजौरीतील बाजीमाल जंगलातील धर्मसाल पट्ट्यात मोठ्या तोफांच्या चकमकीत दोन कॅप्टनसह पाच लष्करी जवानांचा मृत्यू झाल्याच्या आठवड्यांनंतर हा हल्ला झाला.
“पंतप्रधान मोदी यांचा मृत्यू झाला तर काय होईल?”- काँग्रेस आमदाराचे खळबळजनक विधान!
एका न्यूज पोर्टल ने दिलेल्या वृत्तानुसार, या परिसरात आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता, सुरक्षा दल आणि पोलिसांनी दहशतवादी आणि त्यांच्या सहानुभूतींना हुसकावून लावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर घेराव आणि शोध मोहीम सुरू केली आहे. शाहदरा शरीफ हल्ल्याच्या काही दिवस आधी, पोलीस आणि सुरक्षा दलांनी संयुक्त कारवाईत पूंछच्या हरी बुद्ध भागातून एका शाळेच्या मुख्याध्यापकाला अटक केली होती आणि त्याच्या घरातून दारुगोळा आणि दोन चिनी ग्रेनेडसह पाकिस्तान बनावटीचे पिस्तूल जप्त केले होते.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम