सह्याद्री पर्वत रांगामधील शेतकयांसाठी ठरली वरदान; ‘डांगी गाय’

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ११ एप्रिल २०२४ | शेत कामांसाठी ज्या गायी आणि बैलांचा वापर केला जातो त्यामध्ये डांगी जातीला फार महत्व आहे. सह्याद्री पर्वतरांगांमधील शेतक-यांचेसाठी वरदान ठरलेल्या आहेत. जाणून घेऊ या डांगी गायीविषयी.

सदर जातीचा उगम गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यात झालेला आहे. त्यावरूनच या गायीचे नाव डांगी असे पडले आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने नाशिक अकोला, अहमदनगर या जिल्ह्यातही या गायी मोठ्या प्रमाणात आढळतात. या गायी मुख्यत: दूध उत्पादन आणि शेती कामासाठी वापरल्या जातात.

या गायी लहानसर हे मध्यम ठेवणीचा आहे. गायीच्या कातडीखाली तैलग्रंथीचा हलका स्तर असतो ह्यामुळे मोठ्या पावसामध्ये गायी/बैल भिजले तरीही पाणी अंगात मुरत नाही व आजारपण येत नाही हे सर्वात मोठे नैसर्गिक वरदान या गायीला प्राप्त आहे.

या गायी काळ्या रंगावर पांढरे ठिपके, पांढ-या रंगावर काळे ठिपके अशा संमिश्र रंगाच्या असतात. शरीराने पुष्ट असून अतिशय विलक्षण चमक या गायीला प्राप्त होते. नजरेत भरेल अशी आकर्षक कपाळाची ठेवण असते, कपाळामध्ये अगदी मधोमध लहानसर उंचवटा असतो, शिंगे लहान दंडगोलाकृती किंचित मागे झुकलेली व संपूर्णपणे काळ्या रंगाची असतात, नाकपुडी संपूर्णता: काळी व मध्यभागी फुगीर असते, खांदे भक्कम असतात, वशिंड लहानसर आकाराचे पण घट्ट असते, पाय उंचीने जरा लहानसर असतात, खूप एकसंघ, लहान परंतु अत्यंत टणक व संपूर्णता काळे असतात. या गुणामुळेच उंच डोंगरांमध्ये अवघड जागी जाऊन चरणे या गायीला सहज शक्य होते.

 

या गायीचे प्रथम माजावर येण्याचे वय ३६ ते ४४ महिने असते. दूध देण्याचा कालावधी १५० ते १८० दिवसांचा असून एका वेतात ४३० ते ८०० लिटर पर्यंत दूध देते. दिवसाकाठी ३ ते ४ लिटर दूध देण्याची क्षमता सदर गायी मध्ये असते. या गायीचे सरासरी आयुष्य १५ ते १६ वर्ष असते.

ह्या गायीच्या रंगाच्या मिश्रणानुरुप स्थानिक परिभाषेत या गायीचे सहा प्रकार आहेत. १) काळाबाळा २) पांढरा बाळा ३) मणेरी ४) लाल बाळा ५) लाला ६) बाळा.

बैलांच्या अंगामध्ये शेतीकामाची विलक्षण चिकाटी व ताकद असते त्यामुळे सलग ५ ते ६ तास सुद्धा अडचणीच्या उताराच्या खाचरांमध्ये उखळणी व चिखलणीची कामे सहज करतात.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम