शेतकऱ्यांना मोठी दिलासा : कांद्याला मिळणार अनुदान !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १९ ऑगस्ट २०२३ | देशातील कांद्याचे दर घसरत चालले असल्याने अनेक शेतकऱ्यांना मोठा फटका बसू लागला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदा फेकून दिला आहे. यामुळे मोठा आर्थिक फटका देखील बसत आहे. मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा अक्षरशः रस्त्यावर फेकून देण्याची वेळ बळीराजावर आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रती क्विंटल ३५० रुपये प्रमाणे २०० क्विंटलपर्यंत प्रति शेतकरी सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. परंतु अनेक ठिकाणी हे अनुदान मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. त्यामुळे याची दखल पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी घेत, कांदा अनुदान रक्कम शेतकऱ्यांना लवकरच वितरित होणार असल्याचे म्हटले आहे.

paid add

यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कांदा अनुदान रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्याकरिता वित्त विभागाने पणन विभागास ४६५ कोटी ९९ लाख रुपये इतका निधी वितरीत केला आहे. लवकरच कांदा अनुदान रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्याची प्रक्रिया सुरु होईल, अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली. कांद्याच्या दरात झालेल्या अभूतपूर्व घसरणीनंतर या शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी दिनांक २७ मार्च, २०२३ च्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अधिवेशनामध्ये अनुदानाची रक्कम वितरीत करण्याकरता ५५० कोटी रुपयांची पुरवणी मागणी मंजुर करण्यात आली आहे. यापैकी वित्त विभागाने पणन विभागास ४६५.९९ कोटी रुपये इतका निधी वितरीत केला आहे. या अनुदानासाठी लाल कांदा उत्पादक, लेट खरीप कांदा उत्पादक अशा सर्व पात्र कांदा उत्पादक लाभार्थी शेतकऱ्यांच्या मागण्या पणन विभागास प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये २३ जिल्ह्यांमधून कांदा अनुदान मागणी प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यापैकी १३ जिल्ह्यातील अनुदानाची मागणी अल्प स्वरुपाची आहे. उर्वरित १० जिल्ह्यांची मागणी जिल्हानिहाय १० कोटीपेक्षा जास्त आहे. या १३ जिल्ह्यांची मागणी अल्प स्वरुपाची असल्यामुळे या यादीतील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना १०० टक्के देय अनुदानाची रक्कम वितरीत करण्याची कार्यवाही सुरू होणार आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम