१९ वर्षीय तरुणी रमली शेतीमध्ये; स्वतः टेम्पो चालवून शेतमाल विक्रीसाठी जाते मार्केटला!

बातमी शेअर करा

कृषी सेवक । २६ एप्रिल २०२४ । शेती म्हणजे उत्पादन खर्च अधिक आणि उत्पन्न कमी अशी भावना अनेक शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. ज्यामुळे सध्या ग्रामीण भागातील तरुण शेतीपासून दुरावले जात आहे. महिला देखील शेतीपासून दुरावताना दिसत आहे.परंतु, याउलट आज एक १९ वर्षीय तरुणी नोकरी मागे न लागता, उच्च शिक्षण सुरु ठेवून शेतीमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करीत आहे.

४० म्हशींचा गोठा, २५० लिटर दूध; शेतकरी करताय साडेचार लाखांची कमाई!

सिद्धी चौधरी असे या तरुण शेतकरीचे नाव वाहिनी. सिद्धी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील नायगाव येथील रहिवासी आहे. सिद्धीने आपल्या वडिलांकडून संपूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेतली असून, एका बाजूने ती आपले महाविद्यालयीन शिक्षण देखील करत आहे. विशेष म्हणजे ती शेतीतील कामे करताना सर्व साधने चालवते. शेतमाल विक्रीला नेताना स्वतः टेम्पो, दुचाकी चालवून मार्केटमध्ये नेते. त्यामुळे अनेकांना तिच्याविषयी कौतुक वाटते.

कोरोना काळानंतर अनेकजण शाळा, कॉलेजच्या वातावारणापासून दुरावले. त्याचप्रमाणे सिद्धीलाही या काळात घरी राहण्याचा योग आला आणि शेतीशी जवळून संबंध आला. तशी तिला लहानपणापासूनच शेतीची आवड होती मात्र , कोरोना काळापासून ती शेतीमध्ये प्रत्यक्ष काम करू लागली. पिकाला पाणी देणे, खुरपणे, औषधे सोडणे, वेळ आली तर फवारणी करणे, माल काढण्यास आई-वडिलांना मदत करणे, अशी छोटी मोठी कामे ती करू लागली. अशातच तिला शेतीमध्ये काम करूनही आपण चांगले पैसे कमावू शकतो, असा विश्वास निर्माण झाला. त्यामुळे तिने शिक्षण सुरू ठेवून पूर्णवेळ शेतीसाठी द्यायचा निर्णय घेतला. आता ती शेतीमध्ये वांगे, पालक, काकडी, कांदे, पालक, कोथिंबीर आणि इतर भाजीपाला पिके घेते.

Fishery Business | शेती सोडून मासेपालनाकडे वळले; वर्षाला करताय ७ लाखांची कमाई!

सिद्धी चौधरी ही भाजीपाला लागवड करताना फवारणी, व्यवस्थापन आणि विक्रीची सर्व जबाबदारी पार पाडते. विशेष म्हणजे शेतमाल थेट मार्केटला नेऊन विक्री करायचा की विक्रेत्यांना थेट शेतावर विक्री करायचा हा निर्णयसुद्धा सिद्धीच घेते. शेतमाल बाजारात न्यायचा असेल तर सिद्धी स्वतः टेम्पोमध्ये भरून मार्केटला नेते. जर माल कमी असेल तर ती दुचाकीवरून माल घेऊन जाते. शेतमाल घेऊन मार्केटला गेल्यावर इतर शेतकरी आणि व्यापारी तिच्याकडे आश्चर्याने बघतात. अनेकजण रस्त्याने जाताना तिचे कौतुकही करतात.

‘सध्याच्या घडीला नोकरीत रस राहिलेला नाही, त्यातूनही जास्तीत जास्त २० ते २५ हजार रूपयांपर्यंत पगार मिळतो. पण त्यापेक्षा शेतात कष्ट केले तर आपण जास्त पैसे कमावू शकतो. इथे ना कुणाचा दबाव, ना कसले टार्गेट, इथे आपले मालक आपणच असतो, त्यामुळे नोकरीपेक्षा शेती भारी’ असे सिद्धी शेवटी सांगते.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम