कृषी सेवक I ६ डिसेंबर २०२२ I आले पिकाच्या दरात ( सुधारणा होऊ लागली आहे. सध्या आल्याच्या प्रतिगाडीस तीन ते चार हजार रुपयांनी वाढ होऊन प्रतिगाडी (५०० किलो) कमाल १८ ते १९ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. पुढील काळात दरात सुधारणा होणार असल्याचे संकेत तज्ज्ञांकडून मिळत आहेत. दरातील सुधारणेमुळे आले उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळत आहे.
राज्यभरात १५ ते २० हजार हेक्टर क्षेत्रावर आले पिकाची लागवड होते. यामध्ये सातारा जिल्ह्यात साधारणपणे २२०० ते २५०० हेक्टर क्षेत्रावर लागवड होते. यामध्ये सर्वाधिक कोरेगाव, सातारा, कराड, खटाव तालुक्यांत लागवड होते. मागील चार वर्षांत आले पिकाच्या दराने नीचांकी पातळी गाठली होती. यामुळे आले उत्पादक अडचणीत आले होते. मागील चार ते पाच वर्षांपासून आले पिकाच्या दरात संथगतीने का होईना सुधारणा सुरू झाली आहे.
जिल्ह्यात मे महिन्यापासून आले लागवड सुरू होते. या काळात सुरू असलेल्या दरात चार ते पाच हजार रुपये अधिक दर बियाण्यास मिळत असतो. मागील वर्षी आठ ते १२ हजार रुपये दराने बियाणे विक्री झाली होती. या वर्षी बियाण्याचे दर प्रतिगाडी २० ते २५ हजार रुपयांदरम्यान जाण्याची शक्यता आहे. खते, औषधे तसेच मशागतीचे वाढलेले दर व बियाण्याचे दर यामुळे भांडवली खर्चात मोठी वाढ होणार आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम